जळगाव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील.
नेरी नाक्याजवळील श्री वानखेडे कॉलनी गणेश मित्र मंडळातर्फे यंदाचा श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. मंडळातर्फे १२ फूट उंचीच्या श्रीगणरायांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री. व सौ. कृष्णा पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
गणेश आगमनानिमित्त पारंपरिक ढोल-ताशांच्या निनादात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत वानखेडे कॉलनीतील गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. **“गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया”**च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. पुष्पपाकळ्यांचा वर्षाव करत गणरायांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत समाजातील विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीगणरायांची महाआरती करण्यात आली. विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक एकोपा आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न मंडळाकडून करण्यात आला.
गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री वानखेडे कॉलनी गणेश मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्त परिश्रम घेत असून, परिसरात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
