विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
पिंपळगावजवळ ट्रक आणि मालवाहूचा भीषण अपघात; मंत्री गिरीश महाजन यांनी थांबवून केली मदत
नाशिक : मनमाड व परिसरातील दुष्काळी भागाच्या पाहणी दौऱ्यावर जात असताना पिंपळगाव बसवंतजवळ मंत्री गिरीश महाजन यांना रस्त्यावर भीषण अपघात झाल्याचे निदर्शनास आले. ट्रक आणि छोट्या मालवाहू वाहनात झालेल्या या अपघातानंतर महाजन यांनी तात्काळ आपला ताफा थांबवून मदतकार्य सुरू केले.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगावजवळ ट्रक आणि मालवाहू टेम्पोचा समोरासमोर जोरदार धडकेत अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच मंत्री महाजन यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही वाहनांमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांनीही बचाव कार्यात सहभाग घेतला.
सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
दरम्यान, घटनेनंतर मंत्री महाजन यांनी संबंधित जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून जखमींना तातडीने आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत, अशा सूचना दिल्या. वेळेत मदत मिळाल्याने जखमींवर तातडीने उपचार सुरू करता आल्याचे सांगण्यात आले.
