जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.
दिवाळी सणाच्या उत्साहात संपूर्ण शहर आनंदात असतानाच कोल्हे हिल्स परिसरातील जंगलाला भरदिवसा भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने जंगलाच्या मोठ्या भागातून धुराचे प्रचंड लोट आकाशात उठू लागले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये एकच घबराट आणि खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास घडली. सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या आगीने वाऱ्यामुळे आणि वाळलेल्या पालापाचोळ्यामुळे काही क्षणातच उग्र रूप धारण केले. आगीची तीव्रता वाढत असल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तातडीने जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले.
माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांना मोठी कसरत करावी लागली. तब्बल पाच अग्निशमन बंबांमधील पाणी संपेपर्यंत आग विझविण्याचे काम अविरतपणे सुरू होते. अखेर अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, जंगलातील मोठ्या प्रमाणावर वनसंपदेचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, भरदिवसा जंगलाला आग नेमकी कशामुळे लागली? ही आग कोणी मुद्दाम लावली की फटाक्यांच्या ठिणगीमुळे किंवा अन्य काही कारणामुळे लागली, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. या घटनेमुळे कोल्हे हिल्स परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
