जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.

चोपडा शहरातील नारायणवाडी परिसरात अनेक रुग्णालये असताना मागील दोन महिन्यांपासून रस्ते खोदून ठेवल्यामुळे रुग्ण, रुग्णवाहिका आणि सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांवरील खड्डे आणि खोदाईमुळे रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू शकत नाहीत, तर आजारी रुग्णांना अतिरिक्त त्रास सहन करावा लागतो.

याबाबत नागरिकांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांकडे जाब विचारला असता, त्यांच्याकडून “तुम्ही आम्हाला दोन महिने आधी का सांगितले नाही?” असा उलट सवाल करण्यात आला. या उत्तराने स्थानिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे राज्य प्रवक्ते डॉ. चंद्रकांत बारेला यांनी अधिकारी आणि कंत्राटदारांना धारेवर धरत स्पष्ट शब्दांत म्हटले, “नागरिकांनी समस्या सांगितल्यानंतरही प्रशासनाने जबाबदारी झटकणे योग्य आहे का? रस्ता विकास हा नागरिकांच्या सोयीसाठी असतो, त्यांच्या जीवाशी खेळण्यासाठी नव्हे.”

डॉ. बारेला यांनी प्रशासनाकडे तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली असून, रुग्ण आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे. स्थानिकांचा आग्रह आहे की, हॉस्पिटल परिसरातील रस्ते तात्काळ पूर्वस्थितीत आणावेत, जेणेकरून रुग्णवाहिका आणि रुग्णांना कोणतीही अडचण येऊ नये.

रस्ता विकास आवश्यक आहे, पण तो नागरिकांच्या सुरक्षेचा आणि सोयीचा विचार करूनच झाला पाहिजे, असे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!