अंबाडे–खरद रस्त्यावर अवैधरीत्या बैलाची वाहतूक; चारचाकी वाहनासह बैल पोलिसांच्या ताब्यात, संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

चोपडा तालुका प्रतिनिधी – जितेंद्र शिंदे.

चोपडा तालुक्यातील अंबाडे परिसरात अवैध गोवंश वाहतुकीचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी चोपडा शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. गोरक्षकांच्या सतर्कतेने समोर आलेल्या या प्रकरणात पोलिसांनी सुमारे ८ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजेच्या सुमारास अंबाडे ते खरद जाणाऱ्या रस्त्यालगत नितीन धनगर यांच्या घरासमोरील सार्वजनिक जागेवर एका बैलाची अवैधरीत्या वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संबंधित बैलाला सिल्व्हर रंगाच्या चारचाकी वाहन क्रमांक MH-19-CX-2580 मध्ये दोरीने बांधून ठेवण्यात आले होते. तसेच बैलासाठी चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच संशयित आरोपीने वाहन घटनास्थळी सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून चारचाकी वाहन व बैल ताब्यात घेतला.

या कारवाईत ८ लाख रुपये किमतीची चारचाकी गाडी, ३० हजार रुपये किमतीचा बैल असा एकूण ८ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी जयेश शांतराम धनगर, रा. अंबाडे, ता. चोपडा याच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११(१)(D), (E), (F), (H) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९ अन्वये चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांची धडक कारवाई!

या प्रकरणाचा पुढील तपास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करीत आहेत. अवैध गोवंश वाहतूक आणि मुक्या जनावरांवरील क्रूरता रोखण्यासाठी पोलिसांच्या या कारवाईचे परिसरातून स्वागत होत आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!