विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

जळगाव, प्रतिनिधी – जळगाव शहरातील निवृत्तीनगर परिसर आज मंगळवारी भरदिवसा एका धक्कादायक घटनेने हादरून गेला. स्वामी समर्थ केंद्राजवळील एका दुमजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेवर एका तरुणाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गायत्री पाटील (वय ३३) या दुपारी घरात एकट्याच होत्या. त्याच परिसरातील सतीश शिंदे नावाचा तरुण ‘मोबाईल डिस्चार्ज झाला, चार्जिंगला लावायचे आहे’ असे कारण सांगून त्यांच्या घरात शिरला. घरात प्रवेश करताच काही वेळातच त्याने आपला खरा हेतू दाखवला. त्याने सोबत आणलेल्या सर्जिकल ब्लेडने थेट गायत्री पाटील यांच्या गळ्यावर प्राणघातक वार केला.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे गायत्री यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यांचा आक्रोश ऐकून खालच्या मजल्यावर राहणारे राकेश पाटील आणि त्यांच्या पत्नीने तात्काळ वरच्या मजल्याकडे धाव घेतली. त्यांना गायत्री या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या, तर आरोपी सतीश शिंदे हा त्याच ठिकाणी उभा होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात येताच शेजारील नागरिकांनी तत्क्षणी घटनास्थळी गर्दी केली. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला नागरिकांनी प्रसंगावधान राखत रंगेहाथ पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान, गळ्यावर खोल जखम झाल्याने गंभीर जखमी झालेल्या गायत्री पाटील यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण निवृत्तीनगर परिसरात भीतीचे आणि खळबळीचे वातावरण पसरले आहे. आरोपीने हा हल्ला कोणत्या कारणातून केला, याचा तपास पोलीस कसून करत आहेत.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!