चोपडा तालुका प्रतिनिधी, जितेंद्र शिंदे.

चोपडा तालुक्यातील मौजे सनपुले येथील शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी भिल्ल समाजातील कुटुंबांच्या निवासी अतिक्रमणांचे शासनाच्या लागू कायदे, नियम व धोरणांनुसार नियमितीकरण करण्यात यावे, तसेच पात्र व गरजू कुटुंबांना निवासी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीसंदर्भात गटविकास अधिकारी, पंचायत समिती चोपडा तसेच तहसीलदार, चोपडा यांना जनहित निवेदन देण्यात आले आहे. संबंधित कुटुंबांनी स्वतःच्या श्रमातून घरे उभी करून अनेक वर्षांपासून तेथे वास्तव्य केले असून, निवासी हक्काबाबत प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात प्रत्यक्ष वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचे स्थळपंचनामा, सर्वेक्षण व मोजणी करावी, कुटुंबांची पात्रता व वास्तव्याचा कालावधी तपासावा, विशेष ग्रामसभा घेऊन आवश्यक ठराव करावा आणि यापूर्वी सादर केलेल्या अर्जांवर झालेल्या कार्यवाहीचा अहवाल द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

तसेच पात्र कुटुंबांच्या निवासी अतिक्रमणांचे नियमानुसार नियमितीकरण करून निवासी जागा वाटपाची कार्यवाही सुरू करावी. ज्यांच्याकडे स्वतःची निवासी जागा नाही, अशा पात्र व गरजू कुटुंबांचे स्वतंत्र सर्वेक्षण करून शासनाच्या नियमानुसार निवासी जागा उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

१२ ऑक्टोबरला आंदोलनाचा इशारा

मागण्यांवर निर्धारित कालावधीत ठोस व कायदेशीर कार्यवाही न झाल्यास भीम आर्मी भारत एकता मिशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष गणेशजी सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली १२ ऑक्टोबर २०२६ रोजी पंचायत समिती कार्यालय, तहसील कार्यालय चोपडा तसेच जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे संविधानिक व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

आवश्यकतेनुसार धरणे आंदोलन, बेमुदत धरणे व मोर्चा काढण्यासह संबंधित सक्षम प्राधिकरणांकडे तक्रारी व निवेदने सादर करण्याची भूमिका निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!