जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.
जालना शहराला हादरवून सोडणाऱ्या जालना मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने (एजथ) मोठी कारवाई केली आहे. तब्बल २३ कोटी ३३ लाख रुपयांच्या महाघोटाळ्यातील सक्रिय आरोपी प्रवीण पांडुरंग पुरी (वय ३२, रा. पेरजापूर, ता. भोकरदन) याला पोलिसांनी शिताफीने अटक केली असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
जालना मर्चेंट बँकेत वेअर हाऊसच्या नावाखाली आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे १७७ बनावट खातेदार उभे करून बँकेला चुना लावण्यात आला होता. या महाघोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेला सोपवला होता. यापूर्वी या प्रकरणात बँकेचे महाव्यवस्थापक आणि मुख्य सूत्रधारांसह ८ जणांना अटक करण्यात आली होती. आता प्रवीण पुरीच्या अटकेमुळे या घोटाळ्यातील आणखी अनेक ‘पांढरपेशी’ चेहरे उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तपासाचा धडाकाः १० व्या आरोपीला बेड्या ! आर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, तपासात मिळालेले पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबावरून प्रवीण पुरीचा या घोटाळ्यात सक्रिय सहभाग असल्याचे दिसून येत आहे.
