फटाकेमुक्त दिवाळीतून जलसंवर्धनाची जनजागृती; संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी.
सध्या निर्माण झालेली दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि पाण्याचे वाढते संकट लक्षात घेऊन संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी यंदा दिवाळीत फटाके न फोडण्याचा संवेदनशील निर्णय घेतला. फटाके खरेदी करण्यासाठी खर्च होणारे पैसे विद्यार्थ्यांनी शाळेत जमा केले आणि त्या पैशांतून लहान विद्यार्थ्यांसाठी जलसंवर्धनाचा संदेश देणारे विशेष टी-शर्ट तयार करून भेट दिले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा आदर्श निर्माण झाला आहे.

दिवाळी म्हटली की फटाके आणि आतषबाजी हे समीकरण ठरलेले असते. मात्र, सध्याची दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता पाण्याचे महत्त्व समाजातील प्रत्येक घटकाला समजणे आवश्यक आहे. भविष्यातील पाणीटंचाईचे गांभीर्य ओळखून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी फटाक्यांवर खर्च करण्याऐवजी त्या पैशांचा उपयोग जलसंवर्धनाच्या जनजागृतीसाठी करण्याचे ठरविले. विद्यार्थ्यांनी फटाक्यांसाठीचे पैसे शाळेत जमा केले. त्यातून लहान विद्यार्थ्यांना जलसंवर्धनाचा संदेश देणारे टी-शर्ट तयार करून भेट देण्यात आले.
विशेष म्हणजे दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या दिवाळीतील आनंदाला सामाजिक जाणीवेची जोड देत शाळेतील लहान विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविला. या टी-शर्टच्या माध्यमातून लहान विद्यार्थी जलसंवर्धनाचे दूत बनून समाजात पाणी बचतीचा संदेश पोहोचविणार आहेत.
‘फटाके नकोत, पाण्याचे थेंब वाचवा!’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. पाण्याची गळती रोखणे, पाण्याचा अपव्यय टाळणे, पावसाच्या पाण्याचे संकलन करणे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे, या बाबींचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात येत आहे.
संत ज्ञानेश्वर विद्यालयात जलसुरक्षा, जलसंवर्धन, वृक्षबीज संकलन, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाचे विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाप्रती संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण केली जात आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांनी फटाक्यांचा मोह टाळून बचतीच्या पैशांतून लहान विद्यार्थ्यांना जलसंवर्धनाचे टी-शर्ट भेट देणे, ही खऱ्या अर्थाने दिवाळीतील सामाजिक बांधिलकीची अनोखी भेट ठरली आहे. फटाक्यांचा आवाज करण्यापेक्षा जलसंवर्धनाचा आवाज समाजापर्यंत पोहोचविण्याचा हा विद्यार्थ्यांचा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे.
