विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
जळगाव : स्वच्छता आणि नागरी सुविधांच्या दुरवस्थेवरून महापौर दीपमाला काळे यांनी सोमवारी वॉर्ड क्रमांक १६ मध्ये झंझावाती दौरा केला. जुने जळगाव, ट्रान्सपोर्ट नगर आणि लक्ष्मीनारायण नगर या भागात जागोजागी दिसणारे कचऱ्याचे ढीग, तुंबलेले नाले आणि रस्त्यावरच अडवलेले बांधकाम साहित्य पाहून महापौरांनी संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेतले, तर नियम मोडणाऱ्या दुकानदारांनाही कारवाईचा गर्भित इशारा दिला.
‘महापौर स्वच्छता संकल्प अभियान’ या मोहिमेअंतर्गत हा पाहणी दौरा करण्यात आला. नगरसेवक डॉ. विश्वनाथ खडके, सुनील खडके, रंजना वानखेडे, वंदना इंगळे, हर्षल मावळे, प्रदीप रोटे, नरेंद्र सोनवणे यांच्यासह आरोग्य विभागप्रमुख समीर बोरोले, अभियंता विजय मराठे व अन्य अधिकारी दौऱ्यात सहभागी झाले होते.
विठ्ठल मंदिर परिसरात पाहणी सुरू असताना पाणीपुरवठ्याच्या नळांच्या तोट्या तपासण्याची सूचना महापौरांनी केली. अमृत योजनेतील प्रलंबित नळजोडण्या तातडीने पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले. रस्त्यावर पडलेले बांधकाम साहित्य तात्काळ उचलण्यास सांगण्यात आले.
कोल्हे विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या नाल्यात थर्माकोलचे बॉक्स आणि शेवाळ साचल्याचे दिसून आले. ही परिस्थिती पाहून महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पोकलँडच्या मदतीने नाला स्वच्छ करण्यासह वापरात नसलेले शौचालय हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
महामार्गालगत ट्रान्सपोर्ट नगर परिसरात कुशनचा कचरा, तुटलेल्या वाहनांच्या काचा आणि भंगार रस्त्यावरच टाकलेले आढळले. यामुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते. दुकानदारांनी हा कचरा तातडीने हटवावा, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा महापौरांनी दिला.
मोकळ्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश
ट्रान्सपोर्ट नगर मार्केट परिसरातील ओपन स्पेसवर डंपर आणि भंगार वाहने उभी करून जागा अडविल्याचे पाहणीत उघड झाले. सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटवावे, अन्यथा महापालिकाच ती जागा रिकामी करेल, असे महापौरांनी ठणकावून सांगितले. रस्त्याअभावी नागरिकांना, विशेषतः महिलांना होणाऱ्या त्रासाची माहितीही त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली.
साई पार्कजवळ नाल्यालगतच्या घरांना संरक्षण भिंत बांधण्याची सूचना बांधकाम विभागाला देण्यात आली. ट्रान्सपोर्ट नगरजवळील रेड स्वस्तिकच्या मोकळ्या जागेचा महापालिकेच्या कार्यालयांसाठी वापर करता येईल का, याचा अभ्यास करण्यास सांगण्यात आले.
लक्ष्मीनारायण नगरमध्ये नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर दंड आकारावा, नाल्यांची नियमित स्वच्छता करावी आणि बंद पथदिवे सुरू करावेत, असे निर्देश महापौरांनी दिले. या दौऱ्यामुळे वॉर्ड १६ मधील स्वच्छता, अतिक्रमण आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न पुन्हा चर्चेत आले आहेत.
