जळगाव चोपडा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील :
अमली पदार्थांच्या अवैध तस्करी आणि विक्रीला आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत अमली पदार्थ कायद्यांतर्गत (NDPS) दाखल असलेल्या 8 गुन्ह्यांमधील तब्बल 1 कोटी 86 लाख 16 हजार 400 रुपये किमतीचा 930.82 किलो गांजा सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट केला.

ही कारवाई न्यायालयीन आदेश व संबंधित कायदेशीर नियमांचे पालन करून करण्यात आली. जप्त केलेला गांजा सुरक्षितरीत्या नष्ट करण्यात आल्याने अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर मोठा आघात मानला जात आहे.

अमली पदार्थमुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने जळगाव पोलीस सातत्याने कठोर पावले उचलत असून, अशा कारवायांमुळे अमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्यांमध्ये धाक निर्माण होण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधातील मोहीम भविष्यातही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनीही अमली पदार्थांबाबत कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ पोलिसांना देऊन या मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
