विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

पाचोरा : रेल्वे मार्गाच्या कामासाठी खोदून ठेवलेल्या खोल खड्ड्याने एका तरुणाचा जीव घेतला. पाचोरा-जळगाव महामार्गावर गोराडखेडा गावालगत शुक्रवारी, ३१ ऑक्टोबर रोजी रात्री अकराच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. दुचाकी थेट खड्ड्यात कोसळल्याने खडकदेवळा येथील २५ वर्षीय युवक जागीच ठार झाला, तर त्याच्यासोबत असलेले दोन तरुण जखमी झाले.

मृत तरुणाचे नाव विकी संजय निकम (वय २५, रा. खडकदेवळा) असे आहे. विवेक प्रकाश पाटील आणि सोनू नाईक अशी जखमींची नावे आहेत. तिघेही दुचाकीवरून माहिजीहून खडकदेवळ्याच्या दिशेने येत होते. गोराडखेडा परिसरात पाचोरा-जामनेर रेल्वे मार्गाच्या ब्रॉडगेजच्या कामासाठी सुमारे २५ फूट खोल खड्डा खोदण्यात आला आहे.

रात्रीच्या काळोखात रस्त्यालगतचा हा खड्डा दिसला नाही. त्यामुळे भरधाव दुचाकी थेट खड्ड्यात आदळली. अपघात इतका भीषण होता की, विकीचा जागीच मृत्यू झाला. विवेक आणि सोनू यांना गंभीर दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक भागवत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मदतीने विकीला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने खडकदेवळा गावावर शोककळा पसरली आहे.

विकी हा व्यवसायाने जेसीबी चालक होता. त्याच्या मागे वृद्ध आई आणि मोठा भाऊ असा परिवार आहे. रेल्वे कामाच्या ठिकाणी सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना नसल्याने हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांमधून होत आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!