नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर.

महाराष्ट्रात यंदा निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीने बळीराजा पुरता कोलमडला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून नंदुरबार जिल्ह्यातील चारही तालुक्यांचा त्यात समावेश आहे. बळीराजा आर्थिक संकटात असताना त्याच्या मदतीला धावून जाण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) दिव्यांग सेलच्या पदाधिकाऱ्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

शिवसेना दिव्यांग सेलच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे जमा करत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 हजार रुपयांची मदत जमा केली आहे. या मदतीचे वैशिष्ट्य म्हणजे, कोणावरही अवलंबून न राहता, कोणत्याही देणगीची अपेक्षा न करता सर्व दिव्यांग बांधवांनी आपल्या वैयक्तिक उत्पन्नातून आपापल्या परीने योगदान देत हा निधी उभा केला आहे.

हा जमा केलेला 10 हजार रुपयांचा निधी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्यामार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द करण्यात आला.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे आज तो संकटात आहे. अशा वेळी त्याला मदत करणे ही आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. मदतीची रक्कम मोठी की छोटी यापेक्षा ती कोणत्या भावनेतून दिली जाते हे महत्त्वाचे आहे.”

दिव्यांग बांधवांनी स्वतःच्या शारीरिक मर्यादा आणि अडचणी बाजूला ठेवत शेतकऱ्यांसाठी दाखवलेला हा पुढाकार संपूर्ण समाजासाठी सामाजिक बांधिलकी आणि एकोप्याचा आदर्श संदेश देणारा ठरला आहे.

याप्रसंगी शिवसेना दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष अजयसिंग राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष देविदास ठक्कर, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील हिवरे, शहराध्यक्ष भास्कर कुवर, नंदुरबार तालुकाध्यक्ष भिककन घुगे, शहादा तालुकाध्यक्ष राजेंद्र खडे, नवापूर तालुकाध्यक्ष विकास पाडवी यांच्यासह अनेक पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!