चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील.
चोपडा शहर पोलीस स्टेशनने तपास केलेल्या पॉक्सो व अत्याचार प्रकरणात न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत ५ वर्षे सक्तमजुरी व ५,५०० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. हा निकाल माननीय श्रीमती सी. व्ही. पाटील, जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अमळनेर यांनी दिला.
प्रकरणातील आरोपी सलमान खान अख्तर खान (वय २८, रा. हमीद नगर, चोपडा) याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सखोल तपास, ठोस पुरावे व प्रभावी साक्षी यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून शिक्षा सुनावली.

न्यायालयीन सुनावणीदरम्यान भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा सिद्ध झाला. त्यानुसार न्यायालयाने आरोपीस ५ वर्षे सक्तमजुरी, ५,५०० रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.
या प्रकरणात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी विशेष लक्ष देत तपासाची दिशा निश्चित केली. तपास अधिकारी व पोलीस पथकाने पुरावे संकलित करून न्यायालयात भक्कम दोषारोपपत्र सादर केले. तसेच सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. के. आर. बागुल यांनी प्रभावी युक्तिवाद केला.

या निकालामुळे अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांबाबत कठोर संदेश समाजात गेला असून, अशा गुन्ह्यांविरोधात कायदा अत्यंत कठोर असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. चोपडा शहर पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे पीडितेला न्याय मिळाला असून, जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था व महिला सुरक्षेबाबत जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
