जळगाव शहर प्रतिनिधी महेश माळी – जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या अनुषंगाने जळगाव पोलिसांनी सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेदरम्यान विशेष नाकाबंदी मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली. या मोहिमेत एकूण ३११ प्रकरणे नोंदविण्यात आली असून तब्बल ३ लाख ५८ हजार २५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.मा. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. अपर पोलिस अधीक्षक, जळगाव तसेच चाळीसगाव परिक्षेत्रातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि विविध विभागीय शाखांच्या अधिकाऱ्यांना नाकाबंदीचे आदेश देण्यात आले होते.

या कारवाईत ३२ पोलिस अधिकारी आणि २२२ पोलिस अंमलदार सहभागी झाले होते. विविध ठिकाणी नाकाबंदी लावून वाहनांची तपासणी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान करण्यात आलेल्या कारवाईत फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या ४४ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. तसेच नंबर प्लेट नसलेल्या ७८ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!