जळगाव जिल्हा प्रतिनिधी – नूर मोहम्मद तडवी.
महाराष्ट्रातील अनेक भागात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर ता. रावेर जि. जळगाव येथील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, पशुपालक, मत्स्यपालक, आदिवासी समूह, महिला व वंचित घटकांना तातडीने आर्थिक मदत व दुष्काळ निवारणासाठी लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी निवेदन रावेर तहसीलदार यांना देण्यात आले.
हे निवेदन मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना उद्देशून तर प्रत मा. जिल्हाधिकारी जळगाव व मा. तहसीलदार रावेर यांना देण्यात आले. या निवेदनावर महाराष्ट्र दुष्काळ निवारण आणि निर्मूलन समिती, महाराष्ट्र यांच्या वतीने ललित बाबर, सुभाष लोमटे, प्रतिभा शिंदे यांच्यासह इतर सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनातील प्रमुख मागण्या अशा –
दुष्काळग्रस्त शेतकरी व वनपट्टा धारकांना तातडीने आर्थिक मदत द्यावी. दुष्काळामुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ५० हजार, बागायत शेतीस १ लाख, फळबागांना दीड लाख, एकल महिला, भटके विमुक्त आणि आदिवासींना १५ हजार तातडीने मदत, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचा निधी तातडीने द्यावा, शेती पंपाचे वीज बिल माफ करावे, शेतकऱ्यांना १५ हजारांपेक्षा अधिक कर्जाच्या माफीची घोषणा करून ७/१२ कोरा करावा, तसेच शेतकऱ्यांना ६ महिन्याचे रेशन द्यावे.
इतर महत्वाच्या मागण्या:
• सर्व कुटुंबांना मोफत व पुरेसे स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे.
• VB-GRAMG (विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी) योजनेअंतर्गत गावागावात रोजगार हमीची कामे सुरू करावी, नदी खोलीकरण, तलाव खोलीकरणाची कामे करावी.
• दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करून शिष्यवृत्ती द्यावी, आश्रमशाळा सुरू ठेवाव्या.
• दुष्काळग्रस्त भागात Mobile Health Unit द्वारे आरोग्य सेवा द्यावी.
• शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.
• महिलांच्या बचतगटांचे कर्ज माफ करावे, सावकारी कर्जातून मुक्तता द्यावी.
• दुष्काळ काळात PDS मधून ६ महिने मोफत धान्य, मोफत चारा छावण्या सुरू कराव्यात.
• मत्स्यव्यवसाय करणाऱ्या महिला गटांना व मासेमारीसाठी विशेष अनुदान द्यावे.
एकूण १९ प्रमुख मागण्यांचे हे सविस्तर निवेदन असून, या मागण्यांवर १५ दिवसांच्या आत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित विभागांची उच्चस्तरीय बैठक आयोजित करून दुष्काळ निवारणाचा कृती कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी उपस्थित मान्यवर:
या निवेदन प्रसंगी लोक संघर्ष मोर्चा रावेर तालुकाध्यक्ष इरफान उस्मान तडवी, रमेश अनसिंग बारेला, निलेश रुपसिंग तडवी, फिरोज रजाक तडवी, मन्सूर गिरसा तडवी, तुषार नशीर तडवी, गोटू बारेला, हैदर नथु तडवी तसेच रमेश बारीला, गाठू बारेला, मन्सूर तडवी, नुरा तडवी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
