जळगाव जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; मध्य प्रदेशातील खरगोन जिल्हा केंद्रबिंदू, प्रशासन अलर्टवर

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

जळगाव जिल्ह्याला आज शनिवारी सकाळी भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरवले. सकाळी ९ वाजून १६ मिनिटांच्या सुमारास हे धक्के जाणवले. जळगाव शहरासह भुसावळ, यावल, रावेर, सावदा, बोदवड, वरणगाव, मुक्ताईनगर आणि जामनेर परिसरात जमीन काही सेकंद हादरल्याची नागरिकांनी माहिती दिली.

अचानक घरातील वस्तू, पलंग आणि खिडक्या हादरल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली.

काय आहे अधिकृत माहिती?

प्राथमिक माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील भागलपूर तालुक्यातील सुखपुरी परिसरात होता, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या घटनेला दुजोरा दिला असून जिल्हा प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

सुदैवाने कोणतीही हानी नाही

प्रशासनाकडून प्राप्त प्राथमिक माहितीनुसार या भूकंपात सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. मालमत्तेचेही नुकसान झालेले नाही.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!