मुंबई – मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठ पूजेनिमित्त भोजपुरी गाणी वाजवण्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) याला तीव्र विरोध दर्शवत ही गाणी बंद पाडली होती. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावरून भाजपवर थेट हल्लाबोल केला आहे.
राज ठाकरे यांनी शुक्रवार, 13 नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपच्या सोशल मीडियाकडून मुंबईसह महाराष्ट्रात छठ पूजा हा मुद्दा वापरून कसा संघर्ष निर्माण करता येईल, यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
मागील काही दिवसांपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अनेक मोठ्या स्थानकांवर अनाउन्समेंट सिस्टीमद्वारे छठ पूजेची भोजपुरी भक्तीगीतं वाजवण्यात येत होती. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), वडाळा, दादर, सानपाडा आणि आंबिवली यांसारख्या स्थानकांचा समावेश होता.
याला मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सांस्कृतिक लादणूक म्हणत विरोध केला होता.
राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा
राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेशात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप छठ पूजेच्या मुद्द्याचा वापर करून महाराष्ट्रात आणि विशेषतः उत्तर भारतीयांची मोठी लोकसंख्या असलेल्या मुंबईत मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
त्यांनी कार्यकर्त्यांना आणि मराठी जनतेला आवाहन केले आहे की, “त्यांच्या सापळ्यात अडकू नका”. मुंबईच्या काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवण्याचा प्रयत्न झाला, तो मनसे कार्यकर्त्यांनी रुकवला असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
या वादावर भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी, या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे.
