जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

नशिराबाद (जि. जळगाव) : नशिराबाद नगरपरिषदेने पंचवार्षिक फेरमूल्यांकनाच्या नावाखाली मालमत्ता करात केलेली अवाजवी वाढ तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी आज नशिराबाद जनहित समितीने प्रभारी नगराध्यक्ष श्री. पंकज महाजन यांना निवेदन दिले.

आज दिनांक १३ नोव्हेंबर २०२६ रोजी देण्यात आलेल्या या निवेदनात समितीने नगरपरिषद प्रशासनाच्या या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे.

निवेदनात काय म्हटले आहे?

नशिराबाद शहरातील बहुतांश नागरिक हे शेतकरी, शेतमजूर, छोटे व्यावसायिक आणि कष्टकरी वर्गातील आहेत. सध्या अवकाळी पाऊस, अनियमित पर्जन्यमान, एल निनोचा प्रभाव आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात आहे. शेतीमालाला भाव नाही, उत्पादन खर्च वाढला आहे. त्यातच महागाई, वीजबिल, शिक्षण आणि आरोग्याचा खर्च वाढल्याने सर्वसामान्य नागरिक आधीच मेटाकुटीस आला आहे.

एकीकडे महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सवलती देत असताना दुसरीकडे नगरपरिषदेने करवाढ करून सर्वसामान्यांवर अन्याय केल्याचा आरोप समितीने केला आहे.

जनहित समितीच्या प्रमुख मागण्या :

१. पंचवार्षिक वाढीव फेरमूल्यांकन तात्काळ रद्द करावे.

२. वाढीव कर रद्द करून पूर्वीप्रमाणेच कर आकारणी करावी.

३. नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून वाढीव कराला स्थगिती द्यावी.

४. फेरमूल्यांकनातील त्रुटींची निष्पक्ष चौकशी करावी.

५. कर निश्चित करताना नागरिकांना म्हणणे मांडण्याची संधी देऊन पारदर्शकता ठेवावी.

६. शेतकरी, शेतमजूर व आर्थिक दुर्बल घटकांना विशेष सवलत द्यावी.

७. या विषयावर नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा बोलावून नागरिकांच्या हिताचा ठराव मंजूर करावा.

यावेळी समितीने स्पष्ट इशारा दिला की, प्रशासनाने ८ दिवसांच्या आत तातडीची विशेष सभा बोलावून ही करवाढ रद्द करण्याचा निर्णय न घेतल्यास समस्त नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही व कायदेशीर मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी नगर प्रशासनाची राहील.

या प्रसंगी मुकुंदा आनंदा रोटे, सय्यद बरकत अली, गणेश चव्हाण, दगडू माळी, विनायक धर्माधिकारी, रवींद्र रत्नपारखे, सुधीर महाजन, शेख रऊफ, प्रकाश कोळी, योगेश कोलते, प्रशांत पाटील, उल्हास चौधरी, अझरुद्दीन पिंजारी, जितेंद्र बराटे, विजय वाणी, संजय सोनवणे, ललित खुंटे, दीपक चौधरी, भास्कर पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!