पाचोरा शहरात घरफोडीचे सत्र सुरूच, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.
पाचोरा, ता. १३ – पाचोरा शहरात घरफोडीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून चोरट्यांच्या वाढत्या धाडसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील समर्थ कॉलनीत कडी-कोयंडा तोडून घरफोडी करणाऱ्या चोरट्याला रहिवाशांनी प्रसंगावधान दाखवत रंगेहात पकडले. संतप्त नागरिकांनी त्याला चोप देत पाचोरा पोलिसांच्या स्वाधीन केले.
या घटनेत १७ हजार रुपयांची रोकड आणि १ हजार ५०० रुपये किमतीच्या बेंटेक्सच्या वस्तू असा एकूण १८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे समोर आले आहे.
नेमके काय घडले?
समर्थ कॉलनी परिसरातील प्रवीण दिनकर मोरे (वय ३९) यांच्या घराला चोरट्याने लक्ष्य केले. घराचा कडी-कोयंडा तोडून त्याने घरात प्रवेश केला आणि कपाटातील रोकड व बेंटेक्सच्या वस्तू चोरण्याचा प्रयत्न सुरू केला.
मात्र, घरात संशयास्पद हालचाल होत असल्याचे लक्षात येताच शेजारील रहिवाशांनी आरडाओरड करत घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी चोरट्याला घेरून पकडले आणि त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताची चौकशी केली असता त्याचे नाव ईश्वर सुकदेव पवार (रा. सिंधी कॉलनी, पाचोरा) असल्याचे निष्पन्न झाले. त्याने यापूर्वीही शहरात चोरीच्या घटना केल्याची माहिती पोलिस तपासात समोर येत आहे.
याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पाचोरा शहरात घरफोडीच्या घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि बंद घरांना लक्ष्य केले जात असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
