धुळे जिल्हा प्रतिनिधी, प्रमोद बोरसे. मुंबई विशेष वृत्तांत 

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील चौगाव या ग्रामीण भागातील कन्या कु. प्रांजल योगेश गिरासे हिने आपल्या बुद्धिमत्ता, मेहनत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या बळावर संपूर्ण महाराष्ट्रात खानदेशाचा झेंडा अभिमानाने फडकावला आहे. “Aspiring Young Junior Scientist Awards 2026” या प्रतिष्ठित राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेत राज्यातून द्वितीय क्रमांक पटकावत तिने धुळे जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये डॉ. होमी बाबा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रांजलचा सन्मान करण्यात आला. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे उपस्थित मान्यवरांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

विशेष म्हणजे, भारताची सर्वोच्च अंतराळ संशोधन संस्था ISRO ने देखील तिच्या प्रतिभेची दखल घेत तिला तीन दिवसांच्या विशेष शैक्षणिक भेटीसाठी निमंत्रित केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीला मिळालेला हा सन्मान संपूर्ण खानदेशासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

कु. प्रांजल सध्या शिरपूर येथील एच. आर. पटेल उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. अल्पवयात विज्ञान क्षेत्रात मिळवलेले हे मोठे यश तिच्या जिद्दीचे, सातत्यपूर्ण अभ्यासाचे आणि वैज्ञानिक विचारसरणीचे प्रतीक मानले जात आहे. तिच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी नवीन प्रेरणा निर्माण झाली आहे.

प्रांजल ही कै. जयसिंग ओंकार गिरासे व माजी उपसभापती श्री. जगतसिंग आंदनसिंग राजपूत यांची नात असून, रामा फॉस्फेटचे एचआर मॅनेजर श्री. योगेश जयसिंग गिरासे यांची कन्या आहे. तसेच एच. आर. पटेल विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती मनिषा राजपूत यांची ती पुतणी आहे. कुटुंबातील उत्तम संस्कार, शिक्षणाची ओढ आणि कठोर परिश्रम यांच्या बळावरच तिने हे यश संपादन केल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

तिच्या यशामागे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस. जे. पाटील, पर्यवेक्षक श्री. अग्रवाल सर तसेच सर्व शिक्षकवृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शाळेने दिलेले प्रोत्साहन हेच तिच्या यशाचे भक्कम पायाभूत कारण ठरल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री जयकुमारजी रावल, माजी शालेय शिक्षणमंत्री आमदार श्री अमरीशभाई पटेल, मा श्री भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष श्री चिंतनभाई पटेल, आमदार श्री काशीरामजी पावरा, उपाध्यक्ष श्री राजगोपालजी भंडारी, सचिव श्रीमती रेषाजी पटेल, सी ई ओ श्री डॉ उमेशजी शर्मा यांनी प्रांजल गिरासे हिचे विशेष अभिनंदन करत तिच्या पुढील वैज्ञानिक आणि शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने राज्यपातळीवर चमकदार यश मिळवून खानदेशाचे नाव उज्ज्वल केल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.

आज प्रांजल गिरासे ही केवळ एका कुटुंबाची किंवा शाळेची नव्हे, तर संपूर्ण खानदेशाची प्रेरणा बनली आहे. “मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या बळावर कोणतेही स्वप्न साकार करता येते,” हे तिने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. विज्ञान क्षेत्रात झेप घेऊ इच्छिणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी तिचे यश दीपस्तंभ ठरत आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!