जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.

जालना शहरातील अवैध अमली पदार्थ विक्रीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. एका महिलेला अटक करून तिच्याकडून ३ किलो ८०६ ग्रॅम गांजा आणि इतर साहित्य असा एकूण ७८ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक तेजबीर सिंग संधू यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे १२ मे रोजी कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केकाडी मोहल्ला परिसरात छापा टाकण्यात आला.

यावेळी एका महिलेच्या घराची झडती घेतली असता घरातील पोत्यामध्ये गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजासह प्लास्टिक आवरण, कॅरीबॅग, वजन काटा, मोजपट्टी आणि पॅकिंग साहित्य जप्त केले.

या प्रकरणी वंदना केशव शिरगुळे (वय ४०, रा. केकाडी मोहल्ला, जुना जालना) हिला अटक करण्यात आली आहे. तर पुष्पा नाना जाधव ही महिला फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कदीम जालना पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि त्यांच्या पथकाने केली.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!