जळगाव प्रतिनिधी, शाकीर शेख.
महाराष्ट्र राज्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तसेच ‘आपला दवाखाना’ या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये महा लॅबच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयोगशाळा तपासणी व रक्तनमुना संकलन सेवा संबंधित HLL कंपनीची शासनाकडील मागील दोन वर्षांपासूनची देयके प्रलंबित असल्यामुळे बंद झाल्याचे निदर्शनास आले आहे.

सदर आरोग्य सेवा बंद असल्याबाबत नागरिकांकडून आमदार कार्यालयात सातत्याने दूरध्वनी येत असून, या सेवा तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सध्या राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत खासगी रुग्णालये व खासगी प्रयोगशाळांमधील तपासण्यांचा खर्च परवडत नसल्याने गरीब व गरजू रुग्णांना आवश्यक आरोग्य सुविधा मिळविण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. शासकीय आरोग्य संस्थांमधून उपलब्ध होणाऱ्या प्रयोगशाळा तपासणी व रक्तनमुना संकलन सेवा या सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
त्यामुळे शासनाने HLL कंपनीची प्रलंबित देयके तातडीने अदा करून राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व ‘आपला दवाखाना’ या आरोग्य संस्थांमधील महा लॅबच्या प्रयोगशाळा व रक्तनमुना संकलन सेवा त्वरित पूर्ववत सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
