विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिसांनी ४ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी धडक मोहीम राबवली. या मोहिमेत भडगाव, नशिराबाद आणि जळगाव तालुका या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले. सात जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून तीन डंपर, दोन ट्रॅक्टर आणि वाळूसह एकूण ५० लाख १० हजार २६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेला विशेष पथके स्थापन करून अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गोपनीय माहितीच्या आधारे ४ नोव्हेंबर रोजी विविध ठिकाणी पथके तैनात करून ही कारवाई करण्यात आली.

भडगावमध्ये सर्वात मोठी जप्ती

भडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वलवाडी बुद्रुक येथे करण्यात आलेल्या कारवाईत दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या ठिकाणाहून १२ ब्रास वाळू आणि दोन डंपर असा एकूण ४१ लाख ३१ हजार ५६६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संपूर्ण मोहिमेतील ही सर्वात मोठी जप्ती ठरली आहे.

नशिराबादमध्ये महामार्ग पुलावर कारवाई

नशिराबाद पोलिसांच्या पथकाने तरसोद फाट्याजवळील महामार्ग पुलावर सापळा रचून कारवाई केली. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक २९४/२०२६ दाखल करून दोन आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली. तीन ब्रास वाळू आणि एक डंपर असा ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जळगाव तालुक्यात फुफनगरी परिसरात तीन गुन्हे

जळगाव तालुका पोलिसांनी फुफनगरी गाव परिसरातील नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध सलग तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. त्यापैकी एका प्रकरणात खेडी खुर्द गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सार्वजनिक जागेत कारवाई करण्यात आली. गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५०/२०२६ अंतर्गत एका आरोपीविरुद्ध कारवाई करून एक ब्रास वाळू आणि एक ट्रॅक्टर असा २ लाख २४ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याच परिसरात दाखल करण्यात आलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५१/२०२६ मध्ये तीन ते चार घमेले वाळू आणि एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. या मुद्देमालाची किंमत दोन लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात एका आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

या सर्व कारवाया पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत (जळगाव परिमंडळ), अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (चाळीसगाव परिमंडळ), उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे (जळगाव विभाग) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड (चाळीसगाव विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. या मोहिमेत जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश टाक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्यासह त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!