जळगाव प्रतिनिधी, शाकीर शेख.
जळगावच्या चाळीसगाव : शहरातील नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये डेंग्यू, चिकुनगुनिया, हिवताप, हत्तीरोग यांसह जलजन्य व इतर साथीचे आजार तसेच एच.आय.व्ही./एड्स, कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी गुड शेफर्ड ॲकडमी (स्कूल) येथे जनजागृतीपर आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले.

सहायक संचालक हिवताप, नाशिक डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक वर्ग-१ डॉ. राजेंद्र चौधरी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत बोरसे यांच्या आदेशानुसार, तसेच वैद्यकीय अधिकारी श्रेणी-१ डॉ. वैदेही पंडित, डॉ. मंथन, डॉ. बागडे, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. खैरनार, चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. बांगर, आरोग्य विस्तार अधिकारी श्री. सोनवणे व हिवताप पर्यवेक्षक श्री. किरण बेलदार यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव येथील कुष्ठरोग अवैद्यकीय सहायक महेश सूर्यवंशी, समुपदेशक नामदेव अहिरे, एलएसओ सचिन महाले व आरोग्य सेवक दीपक ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डेंग्यू, चिकुनगुनिया, हत्तीरोग व हिवताप यांसारख्या कीटकजन्य आजारांची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी तसेच जलजन्य व साथीच्या आजारांपासून बचाव करण्याच्या उपायांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

तसेच एच.आय.व्ही./एड्स, कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सविस्तर आरोग्य शिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध आजारांबाबत प्रश्न विचारून शंका उपस्थित केल्या. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रश्नांचे निरसन करून योग्य आरोग्यविषयक माहिती दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गुड शेफर्ड ॲकडमीचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षकवृंद तसेच इतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढण्यास मदत झाली.

