जिल्हापेठ पोलिसांसह दामिनी पथकाची धडक कारवाई; सिक्कीम, नेपाळ व मणिपूरमधील तरुणी आढळल्या
जळगाव जिल्हा प्रतिनिधी | निलेश खैरनार
जळगाव : शहरातील गणेश कॉलनी परिसरातील ‘स्पा 99’ पार्लरवर जिल्हापेठ पोलिसांसह दामिनी पथकाने बुधवारी (दि. 2) अचानक धाड टाकत कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी पाच तरुणींची सुटका केल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
‘स्पा 99’मध्ये गेल्या काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणाची चौकशी व माहिती संकलन सुरू केले होते. पार्लरमध्ये काही नागरिकांची संशयास्पद ये-जा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी कारवाईची तयारी केली.
बुधवारी दामिनी पथकाच्या मदतीने जिल्हापेठ पोलिसांनी अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान पार्लरमध्ये पाच तरुणी आढळून आल्या. पोलिसांनी त्यांची सुटका केली असून, त्यापैकी काही तरुणी सिक्कीम, नेपाळ आणि मणिपूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
या कारवाईनंतर आता ‘स्पा 99’मध्ये नेमक्या कोणत्या स्वरूपाच्या हालचाली सुरू होत्या? तसेच या ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींची भूमिका काय होती, याचा सखोल तपास जिल्हापेठ पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, कारवाईनंतर संबंधितांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
🔴 पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गणेश कॉलनी परिसरातील ‘स्पा 99’ पुन्हा चर्चेत आले असून, तपासात नेमके काय समोर येते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
