चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील.
चोपडा यावल रस्त्यावर व गरताड रस्त्यावर संयुक्त मोहीम; दोन डंपरांसह २७.५ ब्रास वाळू जप्त, ४६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

चोपडा तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल व पोलीस प्रशासनाने पहाटेच्या सुमारास मोठी धडक कारवाई करत वाळू माफियांना जबर दणका दिला. दि. १५ रोजी मध्यरात्रीनंतर पहाटे सुमारे २ वाजता प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून यावल रस्ता व गरताड रस्ता परिसरात विशेष मोहीम राबविली. या कारवाईत अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे दोन डंपर ताब्यात घेण्यात आले असून २७.५ ब्रास वाळूसह एकूण ४६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, संबंधित मार्गांवरून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली होती. त्यानुसार प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी तत्काळ महसूल विभागाचे पथक आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने संयुक्त कारवाई सुरू केली. तपासणीदरम्यान दोन डंपर संशयास्पदरीत्या आढळून आले. चौकशी व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर संबंधित वाहनांकडे आवश्यक परवानग्या नसल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर प्रशासनाने दोन्ही डंपरांसह वाळूचा साठा जप्त करून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून महसूल विभागाच्या कठोर भूमिकेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

विशेष म्हणजे, बहुतांश अधिकारी विश्रांतीत असताना प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण कारवाईचे नेतृत्व केले. त्यांच्या या धाडसी, तत्पर आणि कर्तव्यदक्ष भूमिकेची नागरिकांमध्ये सर्वत्र चर्चा होत असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

या मोहिमेत चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महत्त्वाची भूमिका बजावत महसूल विभागाला प्रभावी सहकार्य केले. महसूल व पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईमुळे अवैध वाळू माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात अशा कारवायांची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी यावेळी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “अवैध वाळू उत्खनन व वाहतूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. शासनाचा महसूल बुडविणाऱ्या तसेच पर्यावरणाची हानी करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई केली जाईल.”

पहाटेच्या सुमारास झालेल्या या धडक कारवाईमुळे प्रशासनाचा धाक पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून चोपडा तालुक्यातील अवैध वाळू व्यवसायावर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
