विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
नाशिकमध्ये महापालिका, म्हाडा आणि महसूल विभागाशी संबंधित कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. विभागीय आयुक्तांच्या चौकशीत तलाठी मनीषा पाटील यांच्यासह संबंधित प्रकरणातील अनेक प्रकरणे समोर आली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
म्हाडाच्या सदनिकांसाठी राखीव असलेल्या जमिनीच्या नोंदींमध्ये फेरफार केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. नियमबाह्य पद्धतीने जमिनीचे तुकडे करून रेकॉर्डमध्ये बदल करण्यात आल्याने बांधकाम व्यावसायिकांना फायदा झाल्याचे चौकशीत निदर्शनास आल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणात नाशिक येथील तलाठी अनिल रोकडे, मनीषा पाटील, नितीन चितळकर आणि सागर शेलार या चार तलाठ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच तलाठी मनीषा पाटील यांच्याविरोधात १६ प्रकरणे आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सुमारे ९०० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यामुळे महसूल विभागासह महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. प्रकरणात सरकारी नोंदींमध्ये संगनमताने फेरबदल झाल्याचा संशय असून, या प्रकरणातील इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, प्रकरण न्यायप्रविष्ट असून बांधकाम व्यावसायिकांनी मुंबई उच्च न्यायालयासह विविध ठिकाणी दाद मागितली आहे. त्यामुळे महसूल आयुक्तांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील चौकशीत आणखी कोणाची नावे समोर येतात आणि प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
