सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण; प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयातून यश

सिंधुदुर्गनगरी : स्वगणना मोहिमेत वेंगुर्ला तालुक्यातील मूठ गावाने उल्लेखनीय कामगिरी करत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मूठ हे सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारे जिल्ह्यातील पहिले महसुली गाव ठरले आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक पातळीवरील नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे हा महत्वाचा टप्पा गाठण्यात प्रशासनाला यश आले आहे.

मूठ गावात एकूण ३६ घरे आणि ४३ कुटुंबांचा समावेश असून, गावची लोकसंख्या १४४ आहे. गावातील सर्वच कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली.

या यशामागे तहसीलदार ओंकार ओतारी यांचे सूक्ष्म नियोजन महत्त्वाचे ठरले. तसेच नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी आणि सर्व तलाठी यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हे अभियान यशस्वी झाले. विशेष म्हणजे, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला, ही बाब उल्लेखनीय ठरली.

मूठ गावाची ही कामगिरी जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरली असून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील प्रभावी समन्वयामुळे कोणतेही उद्दिष्ट साध्य होऊ शकते, हे अधोरेखित झाले आहे. जिल्ह्यातील इतर गावांनीही मूठ गावचा आदर्श घेऊन स्वगणना प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!