स्वराज्य वार्ता लाईव्ह, जळगाव
जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रांगणात आज महाराष्ट्र दिन व कामगार दिन अत्यंत उत्साहात आणि चैतन्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित मुख्य ध्वजारोहण सोहळा महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रभक्तीने ओतप्रोत वातावरणात झाली असून महापौर दीपमाला काळे यांनी राष्ट्रध्वजाचे आरोहण केले. आपल्या मनोगतातून महापौरांनी उपस्थित सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्याला उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांच्यासह मनपाचे उपायुक्त, विविध नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. ध्वजारोहण सोहळ्यानंतर प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने सर्व शिक्षा अभियानाचे (शिक्षण विभाग मनपा, जळगाव) सेवानिवृत्त सहाय्यक कार्यक्रम अधिकारी हरिश्चंद्र शंकर सोनवणे यांचा महापौरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी अग्निशमन विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या शिस्तबद्ध पथ संचलनाची पाहणी करून कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी उपस्थितांना आगामी जनगणना प्रक्रियेविषयी सविस्तर तांत्रिक माहिती दिली. या माहितीचा आधार घेत महापौर दीपमाला काळे यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये जनगणना विषयक आवश्यक माहिती भरून स्वतःची नोंदणी पूर्ण केली. महापौरांच्या या कृतीमुळे जळगाव शहर महानगरपालिकेच्या जनगणना अभियानाचा अधिकृत शुभारंभ यशस्वीरीत्या संपन्न झाला. अशा प्रकारे राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देत मनपा प्रांगणातील हा सोहळा उत्साहात पार पडला.
