जळगाव जिल्हा प्रतिनिधी :- जळगाव महानगरपालिकेतील कामकाजात महापौरांच्या पतीकडून होत असलेल्या कथित हस्तक्षेपाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या प्रकारावर तीव्र आक्षेप घेत महापालिका प्रशासनाकडे अधिकृत तक्रार नोंदवली आहे. महापौरांच्या पतीकडून प्रशासकीय कामात अडथळा निर्माण केला जात असल्याचा आरोप करत मनसेने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मनसेचे जळगाव शहराध्यक्ष विनोद शंकर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज महापालिकेचे उपायुक्त यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी नमूद केले की, महापौर दिपमाला काळे यांच्या पतीकडून महापालिकेच्या विविध विकासकामांमध्ये आणि दैनंदिन प्रशासकीय प्रक्रियेत सातत्याने थेट हस्तक्षेप केला जात आहे. हे हस्तक्षेप केवळ सल्ल्यापुरते मर्यादित नसून, ते थेट अधिकाऱ्यांना आदेश देणे, महत्त्वाच्या बैठकांमध्ये उपस्थित राहून निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडणे आणि कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्यापर्यंत पोहोचले आहेत.

कायदेशीर अधिकारांचे उल्लंघन :

विनोद शिंदे यांनी निवेदनात स्पष्ट केले की, महापौर हे पद संविधानाने दिलेल्या अधिकार आणि कर्तव्यांनी बांधलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियमांनुसार, केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनाच प्रशासकीय कामकाजात सहभागी होण्याचा आणि निर्णय घेण्याचा अधिकार आहे. महापौरांचे पती हे कोणत्याही अधिकृत पदावर नसताना प्रशासनात ढवळाढवळ करत असतील, तर ती बाब बेकायदेशीर असून पारदर्शक कारभाराला धक्का लावणारी आहे.

मनसेची मुख्य मागणी:

या गंभीर प्रकारामुळे महापालिकेच्या प्रतिमेला तडा जात असल्याची भावना मनसेने व्यक्त केली आहे. “कोणत्याही अनधिकृत व्यक्तीचा प्रशासनात हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही,” असा इशाराही यावेळी देण्यात आला. प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावा. तसेच, महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केवळ अधिकृत पदाधिकाऱ्यांच्याच आदेशांचे पालन करावे, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने द्याव्यात, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. या प्रकरणी येत्या काळात काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!