जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.
धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडे येथे घरगुती वादातून मुलाने स्वतःच्या पोटच्या आईला केलेल्या मारहाणीत वृद्ध मातेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धरणगाव पोलीस ठाण्यापासून जळगाव रोडवर पूर्वेला सुमारे १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या हनुमंतखेडे गावात ही घटना घडली आहे.
मृत महिला सारीबाबी रसूल पटेल (वय ७३) असे मृत वृद्धेचे नाव आहे, तर रशीद रसूल पटेल (वय ५५) असे आरोपी मुलाचे नाव आहे.
घरगुती कारणावरून रशीद पटेल याचा आई सारीबाबी यांच्याशी वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि रशीद याने आपल्या आईला बेदम मारहाण केली. या मारहाणीत सारीबाबी या गंभीर जखमी झाल्या होत्या.
जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी मुलगा रशीद पटेल याला ताब्यात घेतले आहे.
या घटनेमागील नेमके कारण काय आहे, याचा अधिक तपास धरणगाव पोलीस करीत असून सध्या गावात शांतता आहे.
