धुळे | शिरपूर – महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मृत्यूचा सापळा समजल्या जाणाऱ्या बिजासन घाटात पुन्हा एकदा मध्यरात्री दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात टोळक्याने भरधाव ट्रॅव्हल्स आणि ट्रकवर अचानक दगडफेक करून वाहने अडवून लूटमार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सातपुडा पर्वतरांगांमधील निर्जन असलेल्या बिजासन घाटातून रात्री १२ ते १ च्या सुमारास वाहने जात असताना घाटातील झाडाझुडपात लपलेल्या ४ ते ५ अज्ञात व्यक्तींनी वाहनांवर मोठमोठे दगड फेकण्यास सुरुवात केली.
दोन ट्रॅव्हल्स आणि एका ट्रकचे नुकसान
या भ्याड हल्ल्यात दोन लक्झरी प्रवासी ट्रॅव्हल्स आणि एका मालवाहू ट्रकच्या समोरील आणि बाजूच्या काचा जागीच फुटल्या. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटण्याची शक्यता होती, पण प्रसंगावधान राखत चालकांनी वाहने न थांबवता पुढे दामटली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा मोठी लूट झाल्याचे वृत्त नाही.
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, दगडफेक करून वाहने थांबवून प्रवाशांना लुटण्याचा हा पूर्वनियोजित कट होता.
पोलीस यंत्रणा अलर्टवर
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि शिरपूर तालुका पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घाट परिसरात शोधमोहीम राबवली असून, अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
बिजासन घाटात यापूर्वीही अशा दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. महाराष्ट्राला मध्य प्रदेशशी जोडणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या महामार्गावर दररोज हजारो वाहने प्रवास करतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांचे आवाहन : बिजासन घाटात रात्रीच्या वेळी प्रवास करताना काही संशयास्पद आढळल्यास किंवा अडवण्याचा प्रयत्न झाल्यास वाहन न थांबवता थेट ११२ / १०० वर कॉल करा किंवा जवळच्या पोलीस चौकीशी संपर्क साधा.
