जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.
जळगाव शहरालगत असलेल्या पाळधी परिसरात गोळीबार झाल्याच्या चर्चेने एकच खळबळ उडाली आहे. पाळधी परिसरात अवैधपणे सुरू असलेल्या एका जुगाराच्या क्लबमध्ये गोळीबार झाल्याची जोरदार चर्चा परिसरात रंगली असून, या चर्चेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पाहणी सुरू केली आहे. मात्र, प्रत्यक्षात गोळीबार झाला आहे की ही केवळ अफवा आहे, याबाबत पोलिसांकडून अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
एकाच इमारतीत दोन धक्कादायक प्रकार
या घटनेतील सर्वात धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे, ज्या इमारतीत हा कथित जुगाराचा क्लब सुरू असल्याची चर्चा आहे, त्याच इमारतीच्या खालच्या मजल्यावर पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
एकाच इमारतीत एकीकडे देशसेवेचे स्वप्न पाहणारे ५० हून अधिक विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत होते आणि त्यांच्याच डोक्यावर अवैध जुगाराचा अड्डा राजरोसपणे सुरू होता, हा प्रकार समोर आल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
या घटनेनंतर प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांना घाईघाईने अन्यत्र हलविण्यात आल्याची चर्चा आहे. ५० हून अधिक विद्यार्थी ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेत होते, ते अचानक कुठे गेले? त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल पालक वर्गातून उपस्थित होत आहे.
अनेक अनुत्तरित प्रश्न
1. पोलिसांच्या नाकाखाली महिनोंमहिने जुगाराचा अड्डा सुरू होता, मग कारवाई का झाली नाही?
2. या अवैध धंद्याला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे?
3. गोळीबाराची चर्चा खरी आहे की दिशाभूल करण्यासाठी पसरवलेली अफवा आहे?
सध्या पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून, गोळीबाराच्या चर्चेमागचे सत्य आणि या कथित जुगार क्लबचा मालक कोण? याचा सखोल तपास करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुजाण नागरिकांकडून होत आहे.
