नांदेड (प्रतिनिधी) : दुष्काळात शेतकऱ्यांच्या दारात येऊन सक्तीची वसुली कराल तर एकही फायनान्स कंपनीचे कार्यालय शिल्लक ठेवणार नाही, हा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिलेला इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेने खरा करून दाखवला आहे.

नांदेड शहरात, २ नोव्हेंबर रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी श्रीराम फायनान्स आणि बजाज फायनान्स या दोन मोठ्या खासगी फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांची तोडफोड केली. या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे पार्श्वभूमी?

राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असताना मायक्रोफायनान्स आणि खासगी फायनान्स कंपन्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दमदाटीने, महिलांना त्रास देऊन वसुली करत असल्याचा गंभीर आरोप रविकांत तुपकर यांनी केला होता. त्यांनी थेट इशारा दिला होता की, “वसुलीवाल्यांनो, शेतकऱ्यांच्या दारात याल, महिलांना त्रास द्याल, तर कपडे काढून फटके देऊ!”

नांदेडचे शेतकरी चंद्रकांत शिंदे आणि लातूरचे शेतकरी दत्तात्रय कुंभार या दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूमागे याच जाचक वसुलीचा दबाव असल्याचा आरोप आहे. तुपकर यांनी दोन्ही कुटुंबांची भेट घेऊन या कंपन्यांविरोधात आक्रमक आंदोलनाची हाक दिली होती.

तुपकरांच्या दौऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी नांदेडमध्ये झालेल्या या तोडफोडीमुळे आता क्रांतिकारी शेतकरी संघटना विरुद्ध फायनान्स कंपन्या असा थेट संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. राज्यभरात हे आंदोलन आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत संघटनेकडून देण्यात आले आहेत.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!