जळगाव जिल्हा प्रतिनिधी – जितेंद्र पाटील.

जळगाव : शहराबाहेरील बायपासचे काम अपूर्ण असल्याने अवजड वाहनांची वाहतूक थेट शहरातून सुरू आहे. या निष्काळजीपणामुळे गेल्या तीन महिन्यांत तब्बल नऊ निष्पाप जळगावकरांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रशासनाच्या या बेफिकिरीचा निषेध करण्यासाठी आणि प्रशासनाला जाग आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आकाशवाणी चौकात दुचाकी अपघाताचा अंगावर शहारे आणणारा सजीव देखावा साकारून जोरदार आंदोलन केले.

एखाद्या अपघातात एक जीव जात नाही, तर एक अख्खं कुटुंब उध्वस्त होतं. कुटुंबाचा आधार जातो, मुलांचं भविष्य अंधारात जातं. रस्त्यांच्या असुरक्षिततेमुळे नागरिकांना जीव गमवावा लागत असेल तर ही केवळ अपघातांची मालिका नसून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरचे मोठे प्रश्नचिन्ह आहे, अशी संतप्त भावना मनसेने व्यक्त केली.

रस्त्यांची कामे कासवगतीने, नागरिकांचा जीव धोक्यात

जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या समांतर रस्त्यांची कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने महामार्गाचा वापर करावा लागत आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे खोटेनगर ते कालिका माता मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे स्क्रॅपिंग करून दोन महिने उलटले तरी डांबरीकरण झालेले नाही. रस्ता पूर्णपणे उखडलेल्या अवस्थेत असून दुचाकीस्वारांचा तोल जाऊन भीषण अपघात होण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे बायपास अपूर्ण, दुसरीकडे समांतर रस्ते रखडलेले आणि महामार्गाची दुरुस्ती प्रलंबित – अशा तिहेरी कोंडीत जळगावकरांनी सुरक्षित प्रवास करायचा तरी कसा? असा थेट सवाल मनसेने उपस्थित केला.

यावेळी सादर करण्यात आलेल्या सजीव देखाव्यात दुचाकी अपघाताचे दृश्य, रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले वाहनचालक आणि मोबाईलवर बोलताना कसा अपघात होतो याचे विदारक प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या माध्यमातून नागरिकांमध्ये वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृतीही करण्यात आली.

मनसेचा प्रशासनाला इशारा

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी प्रशासनाला खडेबोल सुनावले.

“जळगावकरांचे जीव स्वस्त नाहीत. रस्ते विकासासाठी असतात, जीव घेण्यासाठी नाहीत. आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार? राष्ट्रीय महामार्ग प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेने तातडीने समन्वय साधून खोटेनगर ते कालिका माता मंदिर रस्त्याची दुरुस्ती, समांतर रस्त्यांची कामे आणि बायपासचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे. बायपास सुरू होईपर्यंत शहरातील अवजड वाहतुकीवर निर्बंध घालावेत. अन्यथा मनसे अधिक आक्रमक आंदोलन करून राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला जाब विचारेल,” असा थेट इशारा त्यांनी दिला.

या आंदोलनात वाहतूक पोलीस सोनाली पवार आणि पोलीस बांधव सिद्धार्थ ढवळे यांनी बचाव कार्याचे प्रात्यक्षिक करून सहकार्य केले.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, आशुतोष जाधव, राजेंद्र निकम, ललित शर्मा, प्रकाश जोशी, वाहतूक सेनेचे रजाक सय्यद, शहर सचिव जितेंद्र पाटील, शाखाध्यक्ष युसुफ खाटीक, राहुल चव्हाण, पंकज चौधरी, चेतन पाटील, समाधान सपकाळे, दीपक राठोड, खुशाल ठाकूर आदी उपस्थित होते. सजीव देखाव्यात ललित शर्मा, खुशाल ठाकूर आणि दीपक राठोड यांनी सहभाग घेतला. आंदोलनाची संपूर्ण तयारी उपमहानगराध्यक्ष आशुतोष जाधव यांनी केली होती.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!