जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. विशेष वृत्तांत.

जळगाव जामोद तालुक्यातील चारबन, वसाडी व भिंगारा गावांना भेट

जळगाव जामोद, जि. बुलढाणा : आदिवासी समाजाच्या प्रश्नांप्रती असलेली दृढ बांधिलकी अधोरेखित करत आदिवासी नेते डॉ. चंद्रकांत बारेला यांनी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील चारबन, वसाडी व भिंगारा या गावांना भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी आदिवासी बांधवांशी थेट संवाद साधला. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या भेटीत त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि जात प्रमाणपत्र, वनपट्टे तसेच इतर प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली.

याप्रसंगी संगीता ताई बारेला, आदिवासी मुखिया उदयसिंग पटेल, राधेश्याम खरात, देवीदास डावर, रामसिंह सस्त्या, अनिल सस्त्या, विशाल जमरा, अशोक चगड, अजय, सुरेश बारेला, दिनेश जमरा, प्रल्हाद चंगड, अनिल जमरा, निहाल सुलिया आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष गावागावांत जाऊन समस्या समजून घेण्यावर डॉ. बारेला यांनी विशेष भर दिला. अनेक वर्षांपासून जात प्रमाणपत्राच्या अडचणी, वनहक्क व वनपट्ट्यांचे प्रश्न तसेच शासकीय योजनांच्या लाभासंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

रात्र असो वा दिवस, आदिवासी बांधवांच्या प्रश्नांसाठी संवाद आणि पाठपुरावा सुरूच राहील, ही भूमिका स्पष्ट करताना डॉ. बारेला यांनी रात्री साडेअकरापर्यंत गावांना भेट देऊन स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. आदिवासी समाजाला न्याय, हक्क आणि सन्मान मिळावा, यासाठी संबंधित प्रश्न शासन व प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचा ठोस पाठपुरावा करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

या दौऱ्यामुळे परिसरातील आदिवासी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न झाला आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!