जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

महापौर स्वच्छता संकल्प अभियानाचा खरा धाक अखेर दिसून आला आहे. शहरातील कानळदा रोडवरील लक्ष्मी नगर परिसरात वर्षानुवर्षांपासून असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमण आणि कचऱ्याच्या साम्राज्याला महापौर सौ. दीपमाला काळे यांनी 24 तासांत पूर्णविराम दिला आहे. महापौरांच्या एका कडक इशाऱ्यानंतर संबंधित व्यक्तीने स्वतःहून आपले महाकाय पत्र्याचे शेड व भंगार साहित्य हटवून घेतल्याने मुख्य हमरस्ता मोकळा श्वास घेत आहे.

काय आहे प्रकरण?

गुरुवार, दि. 15 रोजी महापौर दीपमाला काळे या स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत प्रभाग क्र. 1 ची पाहणी करत होत्या. त्यावेळी कानळदा रोडवरील लक्ष्मी नगर भागातील साईबाबा मंदिरालगत असलेल्या महापालिकेच्या मोकळ्या जागेवर त्यांचे लक्ष गेले. या जागेवर एका व्यक्तीने मोठे पत्र्याचे शेड उभारून त्यात मोठ्या प्रमाणावर भंगार साहित्याचा ढीग रचला होता. या अतिक्रमणामुळे मुख्य रस्ताच आक्रसला होता, तर या शेडच्या आडोशाने नागरिकही तिथे कचरा टाकत असल्याने प्रचंड दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली होती.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महापौर काळे यांनी जागेवरच संबंधित अतिक्रमणधारकाला धारेवर धरले.

“आजच्या आज शेड काढ, नाहीतर उद्या JCB येईल!” – महापौरांचा सज्जड दम

“आजच्या आज तुझे सर्व साहित्य आणि हे पत्र्याचे शेड काढून घे. नाहीतर उद्या महापालिकेचा JCB येऊन हे संपूर्ण अतिक्रमण जमीनदोस्त करेल,” अशा कणखर शब्दांत महापौरांनी संबंधित व्यक्तीला तंबी दिली.

महापौरांच्या या रुद्रावताराचा धसका असा बसला की, दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी त्या व्यक्तीने स्वतःहून मजूर लावून संपूर्ण भंगार साहित्य हलवले आणि पत्र्याचे शेड काढून जागा पूर्णपणे रिकामी करून दिली.

आरोग्य विभागाची तात्काळ ॲक्शन

अतिक्रमण हटताच महापालिकेच्या आरोग्य विभागानेही तातडीने हालचाल केली. ताफा आणि वाहने पाठवून त्या संपूर्ण मोकळ्या जागेची चोख सफाई करण्यात आली. त्यामुळे वर्षानुवर्षे कचऱ्याने व्यापलेली जागा आता स्वच्छ आणि सुंदर दिसू लागली आहे.

नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव

महापालिकेच्या जागेवर कोणीही अतिक्रमण करून बसत असेल तर त्याची गय केली जाणार नाही, हा कडक संदेश या कारवाईतून गेला आहे. महापालिकेची जागा तात्काळ अतिक्रमणमुक्त केल्याबद्दल लक्ष्मी नगर परिसरातील नागरिक आणि स्थानिक रहिवाशांनी महापौर दीपमाला काळे यांचे मनापासून आभार मानले असून त्यांच्या या धडाकेबाज कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!