नाशिक जिल्हा प्रतिनिधी
अंबड औद्योगिक वसाहत पुन्हा एकदा प्रदूषणाच्या मुद्द्यावरून चर्चेत आली आहे. येथील काही बेजबाबदार कंपन्यांकडून सोडले जाणारे केमिकलयुक्त दूषित पाणी थेट नागरी वस्तीत घुसत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
अंबड एमआयडीसीला लागून असलेल्या दत्तनगर, मारुती संकुल आणि तुळजाभवानी नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून नळाला येणाऱ्या पिण्याच्या पाण्याला उग्र वास येत असून, पाण्याचा रंगही बदलला आहे. पाण्यात केमिकलची मात्रा आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे पाणी प्यायल्याने लहान मुले आणि वृद्धांना उलट्या, जुलाबचा त्रास होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
या गंभीर प्रकाराकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत प्रभाग 27 मधील नगरसेवकांनी आज महापालिकेविरोधात आक्रमक आंदोलन छेडले. जोपर्यंत दोषी कंपन्यांवर कारवाई होत नाही आणि नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
“कंपन्यांनी केमिकलवर प्रक्रिया न करता थेट नाल्यात सोडले आहे. तेच पाणी आमच्या पिण्याच्या जलवाहिनीत मिसळत आहे. हा नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने तात्काळ नमुने तपासून दोषींवर गुन्हे दाखल करावेत,” अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाने तात्काळ पाण्याचे नमुने घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे.
