जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

धनत्रयोदशी अर्थात धनतेरसच्या निमित्ताने सोने-चांदी आणि ऐश्वर्याच्या पूजेपेक्षा निसर्गाचे अनमोल धन असलेल्या वृक्षांचे पूजन करण्याचा पर्यावरणपूरक उपक्रम श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आला. यावेळी वरणगावचे नगराध्यक्ष सुनीलजी काळे यांच्या हस्ते वृक्षपूजन करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

भारतीय संस्कृतीत धनतेरसला धन-संपत्ती आणि समृद्धीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. मात्र, मानवी जीवनाला प्राणवायू, सावली, फळे, औषधी तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्याचे अमूल्य कार्य करणारी झाडे हेच खरे धन असल्याचा अनोखा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. सोन्या-चांदीची संपत्ती वैयक्तिक ऐश्वर्य वाढवते; परंतु वृक्षसंपत्ती संपूर्ण सृष्टीला जीवनदान देते. त्यामुळे वृक्षांचे जतन आणि संवर्धन हीच खरी समृद्धी असल्याचा विचार यावेळी मांडण्यात आला.

मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक, वरणगावचे नगरसेवक नानाभाऊ चौधरी, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद भेसे, आकाश निमकर, उपशिक्षिका रूपाली आव्हाड व भाग्यश्री सुर्वे उपस्थित होते.

पारंपरिक सण-उत्सवांना पर्यावरण संवर्धनाची जोड देत वृक्षपूजनातून समाजात निसर्गप्रेमाची भावना रुजविण्याचा प्रयत्न विद्यालयाच्या वतीने करण्यात आला. ‘वृक्ष हेच खरे धन, वृक्षसंवर्धन हीच खरी समृद्धी’ हा संदेश देणारा हा उपक्रम पर्यावरण संरक्षणासाठी प्रेरणादायी ठरला.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!