नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी गती मिळाली आहे. मुंबई येथे पार पडलेल्या महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये नाशिक जिल्ह्यासाठी तब्बल 53,120 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले आहेत. 8 मोठ्या नामांकित कंपन्यांनी या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केले असून, यामुळे जिल्ह्यात 24 हजारांहून अधिक प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे.
राज्य सरकारच्या ‘मेक इन महाराष्ट्र’ मोहिमेला या करारामुळे मोठे बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे ही गुंतवणूक केवळ पारंपारिक उद्योगांपुरती मर्यादित नसून, भविष्यातील तंत्रज्ञानावर आधारित आहे.
या क्षेत्रांमध्ये होणार गुंतवणूक:
• सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स: चिप मॅन्युफॅक्चरिंगमुळे नाशिक देशाच्या नकाशावर हाय-टेक हब म्हणून झळकणार.
• डेटा सेंटर: आयटी क्षेत्राला चालना, मोठ्या प्रमाणावर कुशल रोजगार निर्मिती.
• एरोस्पेस: संरक्षण आणि विमान उद्योगाशी संबंधित सुट्ट्या भागांच्या निर्मितीसाठी मोठी संधी.
• केमिकल उद्योग: रासायनिक उद्योग क्षेत्राचा विस्तार.
या मेगा प्रोजेक्ट्समुळे नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील पुरवठा साखळी, लॉजिस्टिक्स आणि लघु-मध्यम उद्योगांना मोठी चालना मिळणार आहे. हजारो तरुणांना नोकरीसाठी पुणे-मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही, रोजगार आता दारात येणार आहे.
या ऐतिहासिक गुंतवणुकीमुळे नाशिक लवकरच केवळ द्राक्षांची राजधानी न राहता, देशाची सेमीकंडक्टर आणि एरोस्पेस राजधानी म्हणूनही ओळखली जाणार आहे.
