नाशिक जिल्हा प्रतिनिधी

ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात नाशिककरांना कडक उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. मान्सूनने काढता पाय घेताच ऑक्टोबर हीटने आपले रंग दाखवायला सुरुवात केली असून, शहराचे कमाल तापमान 35.1 अंश सेल्सिअस वर पोहोचले आहे. सरासरीपेक्षा हे तापमान 2 ते 3 अंशांनी अधिक आहे.

दुसरीकडे, जिल्ह्यासाठी चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल 69.6% पावसाची तूट नोंदवली गेली आहे. संपूर्ण सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात केवळ 50.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर सरासरी पाऊस 160 मिमी पेक्षा जास्त अपेक्षित होता.

शेतकऱ्यांची चिंता वाढली:

ऐन खरीप हंगामाच्या काढणीच्या वेळी पावसाने ओढ दिल्याने आणि ऑक्टोबर हीट वाढल्याने द्राक्ष, कांदा आणि मका पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धरणांच्या पाणीपातळीवरही याचा परिणाम होणार आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 2-3 दिवस हीच स्थिती कायम राहणार असून, नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडताना काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा असा तडाखा बसत असल्याने यंदाचा ऑक्टोबर अधिक गरम राहणार का, अशी चर्चा नाशिककरांमध्ये सुरू आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!