नळांना तोट्या लावून पाण्याचा अपव्यय टाळा – ॲड. प्रफुल किशोर मेढे यांचे ग्रामस्थांना आवाहन
जळगाव प्रतिनिधी, शाकीर शेख.
अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर : दुष्काळसदृश परिस्थिती आणि वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील अंतुर्ली गावातून एक प्रेरणादायी संदेश देण्यात आला आहे. निर्वाणा फाउंडेशनच्या वतीने गावात नळांना तोट्या लावण्याचा अनोखा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रफुल किशोर मेढे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम घेण्यात आला. गावातील अनेक घरांमध्ये नळांना तोट्या नसल्याने विनाकारण हजारो लिटर पाणी वाया जात होते. ही बाब लक्षात घेऊन फाउंडेशनने प्रत्यक्ष नळांना तोट्या बसवून देत पाणी बचतीची कृतीतून जनजागृती केली.
यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना ॲड. प्रफुल किशोर मेढे म्हणाले, “पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. पाणी भरल्यानंतर नळ व्यवस्थित बंद करणे, नळांना तोट्या लावणे ही छोटी कृती वाटत असली तरी ती भविष्यातील मोठी पाणीटंचाई टाळू शकते. पाणी ही निसर्गाने दिलेली अमूल्य संपत्ती आहे, तिचे संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.”
आज पाण्याची बचत केली तरच उद्याचे भविष्य सुरक्षित राहील, प्रत्येक कुटुंबाने पाणी बचतीची सवय अंगीकारावी आणि इतरांनाही प्रोत्साहित करावे, असा संदेश त्यांनी दिला.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी अक्षय मेढे, किशोर शिरतुरे आणि विकास मेढे यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे गावात पाणी बचतीचा संदेश घराघरात पोहोचला.
निर्वाणा फाउंडेशनने राबविलेला हा उपक्रम केवळ सामाजिक बांधिलकी जपणारा नसून संपूर्ण जिल्ह्यासाठी आदर्शवत ठरत आहे.
