जमिनीच्या वादातून हत्या – २४ तासात घनसावंगी पोलिसांचा तपास यशस्वी, नाशिकमधून दोघांना बेड्या

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.

घनसावंगी तालुक्यातील जिरडगाव येथील रांजणी ते कुंभार पिंपळगाव रस्त्यावरील कंडारी-परतूर फाट्याजवळील पॉवर हाऊस परिसरातील तुकाई हॉटेलचे मालक नामदेव अंजीराम पाईकराव (वय ५५) यांचा धारदार शस्त्राने निर्घृण खून झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत उलगडा करत घनसावंगी पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे.

बुधवारी (ता. ३०) सकाळी ही घटना उघडकीस आली होती. अज्ञात व्यक्तींनी हॉटेल मालक नामदेव पाईकराव यांच्या पोटावर, पाठीवर, उजव्या खांद्यावर व डाव्या बरगडीवर धारदार शस्त्राने वार करून त्यांना जागीच ठार केले होते.

जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच घातला घात

घटनेची माहिती मिळताच घनसावंगी पोलिसांनी तत्काळ दोन स्वतंत्र तपास पथके तयार करून गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली असून हा खून दुसऱ्या-तिसऱ्या कोणी नसून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी सुनील अंजीराम पाईकराव (रा. नाशिक) आणि त्याचा साथीदार सागर आनंदा चंद्रमोरे (रा. म्हसरूळ, नाशिक) या दोघांना नाशिक येथून अटक केली आहे.

तीन दिवसांची पोलीस कोठडी

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना दिनांक ०१/१०/२०२६ रोजी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक केतन राठोड यांच्या नेतृत्वात सहा. पोलीस निरीक्षक अशोक खरात, पोलीस उपनिरीक्षक अजित चाटे, पोलीस हवालदार साईनाथ पवार, कृष्णा मुळे, राधेश्याम गुसिंगे, सर्जेराव तिकांडे यांच्या पथकाने केली आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!