नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर.
नंदुरबार जिल्ह्यातील विविध गावांमध्ये अवैध दारू विक्री, जुगार, मटका, अमली पदार्थ विक्री, दारू तस्करी, नकली दारू व नकली ताडी बनवणे आणि विक्री करणे यासह अनेक अनधिकृत धंदे राजरोसपणे सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत भारतीय जनता पार्टी, नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष निलेश श्रीराम माळी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
काय म्हटले आहे निवेदनात ?
दि. ०१/१०/२०२६ रोजी दिलेल्या निवेदनात (जा. क्र. बी.जे.पी /नंदुरबार/३०३) माळी यांनी म्हटले आहे की, नंदुरबार जिल्हा हा गुजरात व मध्य प्रदेश सीमेला लागून असल्याने अवैध दारू व अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात बिनदास्तपणे सुरू आहे.
नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रातील अविकसितचे माहेरघर बनत चालला असून अवैध धंद्यांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. याचा विपरीत परिणाम युवकांवर आणि सर्वसामान्य नागरिकांवर होत आहे. दारू तस्करीशी संबंधित नुकतीच गोळीबाराची घटना घडली असून सामाजिक वातावरण दूषित होत आहे. अनेक सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक व सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा जिल्ह्याच्या दृष्टीने चिंतेचा व भविष्यातील तरुण पिढीचे भवितव्य लक्षात घेता गंभीर विषय आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या व सार्वजनिक हिताच्या दृष्टीने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
भाजपचा आंदोलनाचा इशारा
तरी नंदुरबार जिल्ह्यातील संबंधित विभागामार्फत सखोल चौकशी करून त्यांच्यावर तातडीने प्रतिबंधात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच अशा प्रकारचे धंदे पुन्हा सुरू होऊ नयेत यासाठी नियमित व प्रभावी यंत्रणा उभी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांच्या हितासाठी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अन्यथा जिल्हाभरात भारतीय जनता पार्टीतर्फे अवैध धंद्यांविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा थेट इशाराच जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, महसूल मंत्री, पोलीस उपमहानिरीक्षक नाशिक आणि पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना देण्यात आल्या आहेत.
