नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी – राम ठक्कर (9175431411)
मुंबई (प्रतिनिधी) :- एकीकडे केंद्र सरकारने मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’ चा दर्जा देऊन गौरव केला असताना, दुसरीकडे महाराष्ट्राच्या जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या सवलत ओळखपत्रांवरच मायबोलीचा विसर पडल्याचे चित्र आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना दिल्या जाणाऱ्या ‘स्मार्ट कार्ड’ वरील सर्व माहिती केवळ इंग्रजीत असल्याने ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या गंभीर समस्येची दखल घेत ‘सुराज्य अभियान’ ने एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांकडे आक्रमक निवेदन सादर केले आहे. या निवेदनात सर्व सवलत ओळखपत्रे तात्काळ मराठी आणि इंग्रजी अशा द्विभाषिक स्वरूपात करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राज्यभरातून प्रवाशांच्या तक्रारी आल्यानंतर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनीही या त्रुटीला दुजोरा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सुराज्य अभियानाने केलेल्या मागणीची तात्काळ नोंद घेत व्यवस्थापकीय संचालकांनी संबंधित विभागाला त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
“महाराष्ट्र राजभाषा नियमानुसार शासकीय कारभारात मराठीचा वापर अनिवार्य आहे. केंद्राने मराठीला अभिजात दर्जा दिला आहे. हा बहुमान आणि प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता एसटीची ओळखपत्रे द्विभाषिक करणे ही काळाची गरज आहे. यामुळे स्थानिक प्रवाशांची सोय होईल आणि राजभाषेचा सन्मानही राखला जाईल,” असे प्रतिपादन सुराज्य अभियानाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक अभिषेक मुरुकटे यांनी केले.

प्रशासनाकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर आता या मागणीची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या :
१. एसटी महामंडळाच्या सर्व सवलत ओळखपत्रांवर प्रवाशांचे नाव, संपूर्ण तपशील आणि नियमावली मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये छापण्यात यावी.
२. संगणकीय प्रणालीत तांत्रिक बदल करून देवनागरी (मराठी) लिपीतील माहितीला प्राधान्य देण्यात यावे.
