विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
जामनेर : शहरातील इंदिरा आवास परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बबलू देविदास वाणी असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सुमारे तीन वाजेच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी बबलू वाणी यांना जखमी अवस्थेत रिक्षातून जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर संबंधित व्यक्ती तेथून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. बबलू यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. दरम्यान, त्यांच्या पायावर तसेच शरीराच्या उजव्या बाजूला जखमा आढळून आल्या आहेत. या जखमा फरफटत नेल्यामुळे झाल्या असाव्यात, तसेच बबलू यांना मारहाण झाली असण्याची शक्यता असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
रिक्षातून रुग्णालयात आणणारे कोण?
बबलू वाणी यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात आणणारे नेमके कोण होते, त्यांना कोणत्या रिक्षातून आणण्यात आले, रिक्षा कुणाची होती आणि बबलू यांच्या शरीरावर जखमा नेमक्या कोणत्या परिस्थितीत झाल्या, याचा सखोल तपास करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
या प्रकरणी मयत बबलू वाणी यांचे भाऊ शुभम वाणी यांच्या माहितीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे करीत आहेत.
बबलू वाणी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे इंदिरा आवास परिसरात शोककळा पसरली आहे.
