जळगांव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील.

भुसावळ : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, भुसावळचे संस्थापक स्व. बाबासाहेब के. नारखेडे यांच्या ४६व्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध लेखन, वक्तृत्व, उत्स्फूर्त वक्तृत्व व सुगम संगीत स्पर्धांसह शिक्षकांसाठी कथालेखन-काव्यलेखन आणि नवसाहित्यिकांसाठी कथासंग्रह, काव्यसंग्रह व कादंबरी राज्य पुरस्कार यांचा पारितोषिक वितरण व पालवी प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला.

शहरातील प्रभावकर हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थाध्यक्ष डॉ. मकरंद एन. नारखेडे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्विद्याशाखीय अभ्यास मंडळाचे विद्यमान अधिष्ठाता प्रा. डॉ. साहेबराव भुकन उपस्थित होते.

या राज्यस्तरीय स्पर्धांना महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ४४० विद्यार्थी स्पर्धक तसेच १०९ नवसाहित्यिकांनी सहभाग नोंदविला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांनी नमुना वक्तृत्व व सुगम संगीताचे सादरीकरणही केले.

कार्यक्रमात संस्थेच्या वार्षिक नियतकालिकातील ज्ञानकर्मी स्व. दादासाहेब एन. के. नारखेडे जन्मशताब्दी वर्ष विशेषांकाचे तसेच विविध प्रकाशनांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी स्व. दादासाहेब नारखेडे यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित ‘एक प्रेरणादायी प्रवास’ या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले.

साहित्य पुरस्कारांनी नवोदितांचा सन्मान

नवसाहित्यिकांसाठी आयोजित स्पर्धेत शिल्पा प्रवीण धोमणे यांच्या कथासंग्रहाला, निशा पराग काळे यांच्या ‘तुझा कस्तुरी स्पर्श’ या कवितासंग्रहाला, तर अंजली अरुण पांडे यांच्या ‘कहाणी जिद्दीची’ या कादंबरीला स्व. बाबासाहेब के. नारखेडे स्मृती राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रमुख अतिथी प्रा. डॉ. साहेबराव भुकन यांनी विद्यार्थ्यांनी आपली क्षमता अधिकाधिक विकसित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा, असे मार्गदर्शन केले. तसेच साहित्यिकांनी स्पर्धेच्या माध्यमातून दर्जेदार साहित्यनिर्मितीचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले. “जो सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवतो, तोच खरा यशस्वी माणूस”, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमात विविध मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, स्पर्धक व मार्गदर्शक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!