विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
नवापूर शहरात पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ सापळा, तक्रार न करण्यासाठी मागितली होती लाच
नंदुरबार / नवापूर, दि. २२ – पोलिसात तक्रार न देण्यासाठी आणि प्रकरण आपसात मिटवण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस पाटीलसह एका खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने [ACB] सापळा रचून रंगेहाथ अटक केली आहे. ही धडक कारवाई नवापूर शहरात करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा मुलगा सायबर कॅफेमध्ये काम करतो. काही महिन्यांपूर्वी तेथे आलेल्या २३ वर्षीय महिला ग्राहकाशी त्याची ओळख झाली होती. गेल्या तीन महिन्यांपासून दोघांमध्ये मोबाईल, व्हॉट्सअॅप आणि मेसेजद्वारे संवाद सुरू होता. ही बाब महिलेच्या पतीच्या निदर्शनास आल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाला.
या वादाचा फायदा घेत महिलेच्या पतीने निलमाजरे, ता. नवापूर येथील पोलीस पाटील गिरीश नाण्यामावची [वय ५२] यांना तक्रारदाराच्या मुलाविरोधात पोलीस तक्रार करण्यास सांगितले. मात्र, या प्रकरणात तक्रार न करता प्रकरण मिटवण्यासाठी पोलीस पाटील गिरीश मावची आणि खाजगी इसम कांतीलाल गावित [वय ४८, रा. अंबाडा, ता. नवापूर] यांनी संगनमत करून तक्रारदाराकडे ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने घाबरून दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपींना ३० हजार रुपये दिले होते. उर्वरित ४० हजार रुपयांसाठी आरोपी सतत तगादा लावत होते. उर्वरित रक्कम देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली.
तक्रारीची गंभीर दखल घेऊन विभागाने पडताळणी केली असता, तक्रार दाखल न करण्यासाठी उर्वरित ४० हजार रुपये स्वीकारण्याचे आरोपींनी मान्य केले. त्यानुसार दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी नवापूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ पंचांसमक्ष सापळा रचण्यात आला. यावेळी कथित आरोपी गिरीश मावची याने कांतीलाल गावित यांच्या उपस्थितीत ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताच ACB च्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ [सुधारित २०१८] कलम ७, ७-अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबारचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत झरपे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
