विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

अंतुर्ली बुद्रुक, ता. भडगाव – अंतुर्ली बुद्रुक शिवारात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या शेतात बिबट्या दिसल्याने आणि बंदिस्त शेडमध्ये घुसून गायीवर हल्ला करून तिला ठार केल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, अंतुर्ली बुद्रुक शिवारातील गट क्रमांक २२६ (हर्षल रवींद्र समदाणी) तसेच गट क्रमांक १२६/२ (निंबा दगा पाटील) परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तरुण शेतकरी राहुल निंबा पाटील हे बैलगाडीने शेतातून जात असताना अचानक बिबट्या त्यांच्या दिशेने धावत आला. प्रसंगावधान राखत राहुल पाटील यांनी बैलगाडीवर चढून मोठ्याने आरडाओरड केली. त्याचवेळी बैलांनीही जोरदार आवाज केल्याने बिबट्याने तेथून पळ काढत जवळील झुडपांचा आसरा घेतला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, याच गावातील शेतकरी सुरेश रामकृष्ण पाटील यांच्या गट क्रमांक २४४/१-ब मधील बंदिस्त शेडमध्ये बिबट्याने प्रवेश केला. शेडमध्ये बांधलेल्या गायीवर हल्ला करून बिबट्याने तिला ठार केले. या गायीची किंमत अंदाजे ३५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या परिसरात बिबट्याचा हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही सुमारे चार महिन्यांपूर्वी याच परिसरातील बंदिस्त शेडमध्ये बिबट्याने प्रवेश करून वासरावर हल्ला केल्याची घटना घडली होती. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे पशुधनाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

बिबट्याच्या सलग घटनांमुळे अंतुर्ली बुद्रुकसह भातखंडे बुद्रुक परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीची कामे करताना, जनावरांची देखभाल करताना तसेच शेताकडे ये-जा करताना बिबट्याच्या हल्ल्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

वन विभागाकडून पंचनामा, ग्रामस्थांची पिंजरा लावण्याची मागणी

वन विभागाने घटनास्थळी तातडीने पाहणी करून बिबट्याचा माग काढावा, त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे व कॅमेरे बसवावेत, तसेच बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, भडगाव वनरक्षक प्रमिला रमेश अंबुरे व मनोज शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत पंचनामा केला. यावेळी शेतकरी सुरेश पाटील तसेच भातखंडे येथील प्रकाश पाटील उपस्थित होते.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!